एकपानी–तीनदाणी हरभऱ्याचा नवा वाण शेतकऱ्यांसाठी ठरतोय लाभदायक, डॉ. वसंत बोंडे यांचे अभिनव कृषी संशोधन
एकपानी–तीनदाणी हरभऱ्याचा नवा वाण शेतकऱ्यांसाठी ठरतोय लाभदायक
डॉ. वसंत बोंडे यांचे अभिनव कृषी संशोधन
हिंगणघाट | प्रतिनिधी निखिल ठाकरे
हिंगणघाट कृषी क्षेत्रात नवसंशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी हरभऱ्याचा एक अभिनव वाण विकसित करण्यात आला आहे. हा वाण डॉ. वसंत बोंडे यांनी झाडापासून विकसित केलेल्या संशोधनातून तयार करण्यात आला असून, त्याची वैशिष्ट्ये पारंपरिक हरभऱ्यापेक्षा वेगळी आणि अधिक फायदेशीर ठरत आहेत.
या नव्या वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे झाडाला एकच पान (एकपानी) असून प्रत्येक शेंगामध्ये तीन दाणे येतात. झाडाची वाढ जोमदार असून दाण्यांचे वजनही अधिक आहे. पीक कालावधी पारंपरिक हरभऱ्यासारखाच असला तरी उत्पादन मात्र लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे निरीक्षणात आले आहे.
तज्ञांच्या माहितीनुसार, या वाणामध्ये सुमारे ४० ते ७० टक्के शेंगा तीन दाण्यांच्या, तर २० ते ३० टक्के शेंगा दोन दाण्यांच्या आढळतात. उर्वरित शेंगा एक दाण्याच्या असतात. पारंपरिक हरभऱ्यात बहुतांश शेंगा एक दाण्याच्या असतात आणि त्यामध्ये ‘एकपानी’ हे वैशिष्ट्य नसते.
या नव्या वाणामुळे प्रति एकर उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा हा वाण कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, असा तज्ञांचा विश्वास आहे.
कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना या वाणाची प्रात्यक्षिके पाहून लागवड करण्याचा सल्ला दिला असून, योग्य व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर आणि प्रभावी रोगनियंत्रण केल्यास उत्पादनात आणखी वाढ होऊ शकते, असेही नमूद केले आहे.
एकूणच, एकपानी–तीनदाणी हरभऱ्याचा हा नवा वाण भविष्यात शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.