रमना ग्रामपंचायतीतील कचरा निर्मूलन कक्ष पडझडीत निधीच्या अपव्ययाचा संशय; चौकशीची मागणी

Sun 15-Feb-2026,10:45 AM IST -07:00
Beach Activities

रमना ग्रामपंचायतीतील कचरा निर्मूलन कक्ष पडझडीत,निधीच्या अपव्ययाचा संशय; चौकशीची मागणी

वर्धा तालुका | प्रतिनिधी : इरशाद शहा

रमना ग्रामपंचायत अंतर्गत उभारण्यात आलेला कचरा निर्मूलन कक्ष सध्या वापराअभावी पडझडीच्या अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या अपेक्षेने उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात निष्क्रिय ठरल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कचरा वर्गीकरण व व्यवस्थापनासाठी बांधण्यात आलेला कक्ष दीर्घकाळापासून बंद आहे. देखभालअभावी इमारतीला तडे गेले असून ती कोसळण्याच्या स्थितीत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कामासाठी खर्च झालेल्या ग्रामपंचायत निधीचा अपव्यय झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच गावात वाटपासाठी आणण्यात आलेल्या कचरा बकेट्सबाबतही शंका व्यक्त होत आहेत. अनेक नागरिकांना कचरा बकेट्स मिळाल्या नसल्याचे सांगितले जात असताना, त्या बकेट्स नेमक्या कुठे वितरित झाल्या याबाबत स्पष्ट माहिती नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

ग्रामपंचायत सचिव विद्याताई जिवतोडे यांच्या कार्यकाळात या कामांसाठी खर्च झालेल्या निधीबाबत पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी काही ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही.

दरम्यान, नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच कचरा निर्मूलन कक्ष तात्काळ कार्यान्वित करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. स्वच्छता व्यवस्थेच्या नावाखाली खर्च झालेला निधी प्रत्यक्षात जनहितासाठी उपयोगात यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. हा विषय वर्धा तालुक्यात चर्चेचा ठरत आहे.