वृक्षारोपण मोहिमेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा : इमरान राही
वृक्षारोपण मोहिमेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा : इमरान राही
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा : वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेता वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. केवळ शोभेची झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी युवक व शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन युनिव्हर्सल मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमीचे राष्ट्रीय सल्लागार इमरान राही यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी शहीद हुतात्मा स्मारक परिसरात तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन, वर्धा जिल्हाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इमरान राही प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमीचे महासचिव उल्हास वाघ, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे प्रदेश संघटक हरीष तांदळे, माजी प्रदेशाध्यक्ष विजय नाखले, कार्यकारिणी सदस्य राजू लभाणे, लिलाताई वाघ, सेन्साई साहिल वाघ, सेन्साई अमोल मानकर, विक्रांत गव्हाणे, सायली वाघ, आशुतोष चव्हाण, हमेरा सदफ राही यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी, प्रशिक्षक आणि पालकांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. रेखा वाघ, सुनील पाटील, नितीन यादव, प्रेम कवर, आर्यन छापेकर, समर्थ लाजूरकर, तनुश्री पांडे, धनश्री मैंद आणि वैष्णवी पांडे यांच्यासह अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.