जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दारोडा इन्फ्रा टोलकडून विविध उपक्रमांचे आयोजन

Sat 06-Jun-2026,03:15 AM IST -07:00
Beach Activities

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दारोडा इन्फ्रा टोलकडून विविध उपक्रमांचे आयोजन

वडनेर नाज़िम खान 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टच्या बोरखेडी–वडनेर–केळापूर प्रकल्पांतर्गत दारोडा टोल प्लाझा येथे विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

“एक पेड़ माँ के नाम” या संकल्पनेतून १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच रोड युजर्सना त्यांच्या घर परिसरात लागवड करण्यासाठी ६० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.

पर्यावरणाचा ऱ्हास, वाढते प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. वाढती वृक्षतोड आणि त्यामुळे वाढणारे तापमान लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान “झाडे लावा, पर्यावरण वाचवा”, “हिरवे जग – सुखी जीवन”, “प्रदूषण थांबवा, जीवन सजवा” आणि “एकच पृथ्वी, एकच ध्यास – पर्यावरण रक्षण हाच आमचा श्वास” या घोषवाक्यांद्वारे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी “पाणी अडवा – पाणी जिरवा” या संकल्पनेवर भर देत पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करण्याबाबत रोड युजर्स आणि टोल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण जनजागृतीसाठी टोल परिसरात विविध माहितीपर फलकही लावण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आर. मधुसूदन (टीम लीडर), एम. मसूर रहमान (सेफ्टी कन्सल्टंट), अमित कुमार राणा (प्रोजेक्ट हेड), बाला गणेश (सिनियर मॅनेजर), ऋषिकेश आनंद, पंकज हिंगे, मलखित सिंह, नीरज रमाणी, सत्यपाल वैद्य, भानुप्रताप सिंह, राजपाल सिंह, अमित दास, दिनेश अल्लेवार, रोनीत सिंह तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.