घरफोडीचा दोन तासांत उलगडा; आरोपी अटकेत, ८० हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत
घरफोडीचा दोन तासांत उलगडा; आरोपी अटकेत, ८० हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत
करंजा (घाडगे) : युसूफ पठाण
करंजा (घाडगे) पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांत छडा लावत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेले सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळविले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागझरी येथील रहिवासी मनीषा मनोहर चोपडे यांनी ६ जून २०२६ रोजी करंजा (घाडगे) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, रात्री त्या, त्यांचे पती आणि मुले घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिने असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला.
तक्रार प्राप्त होताच करंजा (घाडगे) पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित अतुल अर्जुन मेश्राम (रा. नागझरी, ता. करंजा घाडगे, जि. वर्धा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे झुमके जप्त करण्यात आले आहेत. घरफोडीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस आणल्यामुळे करंजा (घाडगे) पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदान, पोलीस हवालदार निलेश मंडारी, अमोल मनमोडे, दिनेश घासड, आशीष कालोकर व समाधान पांडे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.