पुलगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई; दोन चोरीचे गुन्हे उघड, १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुलगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई; दोन चोरीचे गुन्हे उघड, १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
पुलगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवत दोन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला असून आरोपीकडून एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र उत्तमराव येवले (वय ६४, रा. सोरटा, ता. आर्वी, जि. वर्धा) यांच्या शेतातील पक्क्या बांधलेल्या बंड्यात शेतीसाठी लागणारे साहित्य व बियाणे ठेवण्यात आले होते. दिनांक २ जून २०२६ रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना बंड्याचे कुलूप तुटलेले व कोंडा वाकलेला दिसला. आत जाऊन पाहणी केली असता तुरीचे तीन कट्टे, गव्हाचे दोन कट्टे, सौर बॅटरी, झटका मशीन, कुलर व फवारणी पंप असा एकूण ३२ हजार ७०० रुपयांचा माल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान गावातील नागरिकांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल नरेश मडावी (वय २६, रा. मुरदगाव (बेलसरे), ता. देवळी, जि. वर्धा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने गणेश उर्फ बंटी हरिदास गाडेकर याच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून सदर गुन्ह्यातील ३२ हजार ७०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पुलगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य एका चोरीच्या गुन्ह्यातील २१ हजार रुपयांचे सहा कट्टे चणेही हस्तगत करण्यात आले. याशिवाय चोरीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे १ लाख रुपये किमतीची पल्सर २२० मोटारसायकल जप्त करण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना खारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या निर्देशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर तसेच विनोद रघाटाटे, संदीप बोरबन, अजय अनंतवार, सोमेश मंडे व गणेश इंगळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून पुलगाव पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.