१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; दोन विधीसंघर्षित बालके ताब्यात, २.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Thu 04-Jun-2026,04:56 AM IST -07:00
Beach Activities

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; दोन विधीसंघर्षित बालके ताब्यात, २.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा तालुका प्रतिनिधी – इरशाद शाह

वर्धा : वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेशनफेल परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत पोलिसांनी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच चोरीच्या पैशांत खरेदी केलेले साहित्य असा एकूण २ लाख १२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशनफेल परिसरातील रहिवासी बेबी लक्ष्मण कोराटे (वय ६२) यांनी ३ जून २०२६ रोजी वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी घराबाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८३ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्धा शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचे कानातील दागिने, नथ, मणी, चांदीच्या पायपट्ट्या, मनगटे, जोडवे, चाळ, चोरीच्या रकमेतील खरेदी केलेले कपडे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण २ लाख १२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदानंद वाघमारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकशेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार गजेंद्र धर्मे, प्रशांत बंजारी, नरेंद्र कांबळे, नितीन इटंकर, पोलीस अंमलदार वैभव जाधव, श्रावण पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा मोठा हिस्सा हस्तगत करण्यात वर्धा शहर पोलिसांना यश मिळाले आहे.