राज्याभिषेक दिनानिमित्त वृक्ष सेवा समितीची वृक्षारोपण मोहिम सुरू
राज्याभिषेक दिनानिमित्त वृक्ष सेवा समितीची वृक्षारोपण मोहिम सुरू
शिवराज्याभिषेक दिन ते शिवजयंतीपर्यंत राबविणार विशेष अभियान
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त वृक्ष सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण करून उत्साहात राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच टेकडीवरील बुद्ध प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आले.
महापुरुषांच्या नावाने उत्सव साजरे करण्याबरोबरच समाजासमोरील भविष्यातील संकटांची जाणीव निर्माण व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने वृक्ष सेवा समितीने राज्याभिषेक दिन ते शिवजयंती या कालावधीत विशेष वृक्षारोपण मोहिम सुरू केली आहे. वर्धा जिल्ह्यात वाढत असलेल्या तापमानाच्या समस्येला आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.
सिंदी (मेघे) येथील स्मशानभूमीलगतच्या टेकडीवर वृक्ष सेवा समिती २०१८-१९ पासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य सातत्याने करीत आहे. पेपर रद्दी संकलन उपक्रमातून निधी उभारून येथे बोअरवेल व संपूर्ण टेकडीवर पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात सुमारे ५ हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
लोकसहभागातून ‘एक झाड – ३०० रुपये’ या संकल्पनेअंतर्गत आतापर्यंत १६७ झाडांसाठी योगदान प्राप्त झाले असून यावर्षी किमान ५०० झाडे लावण्याचा संकल्प समितीने केला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम कोणतीही शासकीय मदत न घेता लोकसहभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
एक जबाबदार वर्धेकर नागरिक म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची सामूहिक नैतिक जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी आणि या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष निखिल सातपुते यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव रवींद्र नागपूरकर, समन्वयक प्रशांत काळबांडे यांच्यासह प्रदीप मेंढे, राहुल गोल्हर, श्यामभाऊ परसोडकर, किशोर बाहे, हेमंत माध्यसवार, रोशन पटेल, मोहनिष पोतद्दार, अशोक भिवगडे, किशोर बोकडे, विजय गावंडे, उत्कर्ष देशमुख, विनोद बाकरे, कृष्णा नांदुरकर, जनार्दन तिमांडे, राजेश बोरिकर, बाबाराव आगलावे, श्रीकांत शेंडे, पूजा पोतद्दार, विशाल ढोबरे, विनोद धनविज, अविनाश मोहोळ, प्रशांत लटारे, योगेश चौधरी, हर्षल व्यास, प्रमोद सातपुते, महादेवराव शेंडे, आनंद मडावी, दीपक मांडोकार, सुनील बेदरकर, निलेश राऊत, प्रमोद ढागे, प्रविण पेठे, राधा पडवे, कांचन भिवगडे, प्रिया शेंडे, कोमल नागपूरकर, शुभम सातपुते आदींसह अनेक नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदविला.