सेलू येथील ३० वर्षीय भाजीपाला व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Thu 04-Jun-2026,04:48 AM IST -07:00
Beach Activities

सेलू येथील ३० वर्षीय भाजीपाला व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

अवघ्या महिनाभरापूर्वी झाले होते लग्न; परिसरात हळहळ

प्रतिनिधि नाज़िम खान 

वडनेर वार्ताहर : पोहना येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्यासाठी गेलेल्या सेलू येथील एका ३० वर्षीय तरुण व्यापाऱ्याचा अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सेलू, शेकापूर, वडनेर, पोहना परिसरात शोककळा पसरली आहे.

शुभम जुनघरे (वय ३०, रा. सेलू, शेकापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम जुनघरे हे नेहमीप्रमाणे पोहना येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्यासाठी गेले होते. दुकानाची तयारी सुरू असतानाच त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने पोहना येथील स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना हिंगणघाट येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मित्रांनी त्यांना तत्काळ हिंगणघाट येथील रुग्णालयाकडे नेले. परंतु, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

महिनाभरापूर्वीच बांधली होती लग्नगाठ

शुभम यांचा विवाह अवघ्या महिनाभरापूर्वीच पार पडला होता. घरात नव्या संसाराचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच नियतीने घाला घातल्याने जुनघरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हसतमुख, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावामुळे शुभम यांची परिसरात चांगली ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.