शेतकरी कर्जमाफीसाठी वर्ध्यात तीव्र आंदोलन
शेतकरी कर्जमाफीसाठी वर्ध्यात तीव्र आंदोलन
जीआरची होळी; सर्वसमावेशक कर्जमाफीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा, दि. १८ : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" मधील अटी व निकषांविरोधात वर्धा जिल्हा शेतकरी-कामगार आंदोलन समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी वर्ध्यात आंदोलन करण्यात आले. शासन निर्णयाच्या (जीआर) प्रतीची होळी करून शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक कर्जमाफीची मागणी लावून धरली.
महात्मा गांधी पुतळा परिसरात आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी शासनाच्या कर्जमाफी योजनेतील अटींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्री, महसूल मंत्री व कृषी मंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले.
निवेदनात राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वअट न ठेवता सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच २०१९ पूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेत समाविष्ट करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणे, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर मदत वाढविण्याची मागणीही करण्यात आली.
आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने कर्जमाफी योजनेतील निकषांचा पुनर्विचार करून सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी ॲड. अविनाश काकडे, यशवंत झाडे, सुधीर पांगुळ, डॉ. अभ्युदय मेघे, सुनील कोल्हे, सुदाम पवार, प्रफुल कुकडे, द्वारका इमडवार, संदीप किटे, मंगेश शेंडे, प्रा. नूतन माळवी, संजय काकडे, प्रा. प्रवीण भोयर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.