आत्मनिर्भर शेतकरीच ग्रामीण भारताचे चित्र बदलू शकतो : पद्मश्री शंकरबाबा पापळकर
आत्मनिर्भर शेतकरीच ग्रामीण भारताचे चित्र बदलू शकतो : पद्मश्री शंकरबाबा पापळकर
वर्धा सोशल फोरमच्या ‘मान्सून भेट-२०२६’ कार्यक्रमात मार्गदर्शन; गरजू शेतकरी कुटुंबांना मोफत बियाण्यांचे वाटप
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा, दि. १४ : अनाथ, दिव्यांग व निराधार बालकांच्या संगोपनासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या तसेच २८ गरीब व दिव्यांग मुलींचे कन्यादान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर बनण्याची गरज व्यक्त केली. केवळ शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन, लघुउद्योग आणि इतर पूरक व्यवसाय स्वीकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक संकटातून मार्ग निघू शकतो, असे त्यांनी सांगितले.
बॅचलर रोड येथील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात वर्धा सोशल फोरमतर्फे आयोजित ‘मान्सून भेट-२०२६’ तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी बोलताना पापळकर यांनी समाजसेवेतील आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. समाजातील सक्षम व्यक्तींनी गरजूंना मदतीचा हात देत आत्मनिर्भर समाज उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच युवकांनीही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन समाज परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान आत्महत्याग्रस्त व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी कुटुंबांना खरीप हंगामासाठी तीन एकर क्षेत्राच्या पेरणीसाठी मोफत बियाण्यांचे वितरण करण्यात आले. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच कृषीपूरक व्यवसायांकडे वळण्याचे आवाहनही शेतकऱ्यांना करण्यात आले.
पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी आतापर्यंत २८ गरीब व दिव्यांग मुलींचे विवाह लावून दिल्याची माहिती देत हा सामाजिक उपक्रम भविष्यातही सुरू राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरिकर, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, सचिव अविनाश सातव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. वर्धा सोशल फोरमच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत समाजहितासाठी प्रेरणादायी पाऊल असल्याची भावना व्यक्त केली.