अल्लीपूर येथे संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी वारी सोहळ्यास अतुल वांदिले यांची उपस्थिती
अल्लीपूर येथे संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी वारी सोहळ्यास अतुल वांदिले यांची उपस्थिती
अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे
संत परंपरा, भक्ती, समता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या अल्लीपूर ते पंढरपूर पायदळ पालखी वारी सोहळ्याला यंदा उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या पवित्र सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले तसेच वारकरी बांधवांशी संवाद साधला.
यावेळी अतुल वांदिले यांनी पालखी सोहळ्याच्या विविध व्यवस्थांची पाहणी केली. वारकऱ्यांच्या निवास, भोजन, आरोग्य व अन्य सुविधांची माहिती घेत त्यांनी आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले. संतांच्या विचारांचा वारसा जपणारी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात बंधुभाव, समता आणि मानवतेची शिकवण देणारी एक सामाजिक चळवळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा प्रसार करत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या पालखी सोहळ्यात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात वारकरी बांधवांनी आपली श्रद्धा व्यक्त केली. पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.
अतुल वांदिले यांनी वारकरी बांधवांच्या सेवाभावाला सलाम करत संत परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी वामनराव खोडे, मारोतराव मुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना झाडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद वरभे, तेलरांधे गुरुजी, सचिन पारसडे, योगेश खोडे, तपासे गुरुजी, डॉ. झीलपे, हिंगे महाराज, पिसे गुरुजी तसेच परिसरातील ग्रामस्थ आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.