हिंगणघाटचे शैक्षणिक वाळवंट; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे सक्तीचे स्थलांतर

Thu 18-Jun-2026,05:51 AM IST -07:00
Beach Activities

हिंगणघाटचे शैक्षणिक वाळवंट; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे सक्तीचे स्थलांतर

हिंगणघाट | प्रतिनिधी निखिल ठाकरे 

कापूस उत्पादन, औद्योगिक विकास आणि आर्थिक उलाढालीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट तालुक्यात उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. उद्योगांच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या या तालुक्यात दर्जेदार उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा अभाव असल्याने स्थानिक तरुणांचे भविष्य प्रश्नचिन्हाखाली आले आहे.

दरवर्षी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शेकडो विद्यार्थी नागपूर, पुणे, मुंबई यांसारख्या शहरांकडे उच्च शिक्षणासाठी रवाना होतात. स्थानिक स्तरावर दर्जेदार अभियांत्रिकी, व्यवस्थापन (एमबीए), वाणिज्य, विज्ञान व कला शाखेतील उच्च शिक्षणाच्या संधी मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांसमोर स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

या परिस्थितीमुळे सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत असून, विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन आणि शिक्षणासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. अनेक कुटुंबांना यासाठी कर्जाचाही आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

हिंगणघाट परिसरात कापूस प्रक्रिया आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित अनेक उद्योग कार्यरत आहेत. मात्र या उद्योगांतील तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदांवर बाहेरील राज्यांतील कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून येते. याउलट स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणावर अकुशल कामगार म्हणून काम करत असल्याची बाब चिंतेची मानली जात आहे.

स्थानिक तरुणांमध्ये क्षमता आणि गुणवत्ता असूनही त्यांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध नसल्याने रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत आहे. कापूस आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित विशेष अभ्यासक्रम, डिप्लोमा व कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, हिंगणघाटमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब असली तरी त्याचबरोबर व्यवस्थापन, तंत्रज्ञान, उद्योगाभिमुख आणि रोजगारक्षम शिक्षण संस्था उभारण्याचीही आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

शैक्षणिक व रोजगाराच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक गरजांवर आधारित कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणे, एमबीए व तांत्रिक शिक्षण संस्था स्थापन करणे तसेच स्थानिक उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय निर्माण करणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हिंगणघाटला केवळ उद्योगनगरी म्हणून नव्हे तर कुशल मनुष्यबळ घडविणारे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. स्थानिक तरुणांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

— सचिन थारकर, सजग नागरिक व लेखक