एकीकडे सालोड हिरापूर विकासाच्या वाटेवर, तर दुसरीकडे एकता ड्रीम लेआऊट अंधारात!

Wed 17-Jun-2026,10:30 PM IST -07:00
Beach Activities

एकीकडे सालोड हिरापूर विकासाच्या वाटेवर, तर दुसरीकडे एकता ड्रीम लेआऊट अंधारात!

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

सालोड हिरापूर, दि. 16 जून – ग्रामपंचायत सालोड हिरापूर अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक ४ मधील एकता ड्रीम लेआऊट परिसरातील स्ट्रीट लाईट मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत आहे. याबाबत रहिवाशांनी 25 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देऊन स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र तब्बल तीन महिने उलटूनही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी परिसरातील स्ट्रीट लाईट नियमितपणे सुरू होते. मात्र अचानक लाईट बंद झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

"अंधाराकडून प्रकाशाकडे" हा गावाच्या विकासाचा मंत्र असताना एकता ड्रीम लेआऊटमधील नागरिक मात्र आजही अंधारात जीवन जगत आहेत. गाव विकासाच्या वाटचालीत अग्रेसर असल्याचा दावा केला जात असताना आमच्याच परिसराकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दत्तक घेतलेल्या गावातच मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

तसेच वार्ड क्रमांक ४ मधील समस्या दीर्घकाळ प्रलंबित असताना स्थानिक वार्ड सदस्यांनी याबाबत कोणती पावले उचलली, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन बंद पडलेले स्ट्रीट लाईट सुरू करावेत, अशी मागणी केली आहे