वर्धा जिल्हा पोलीस दलाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

Thu 18-Jun-2026,06:08 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा पोलीस दलाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

वर्धा | तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा

"रक्तदान हेच श्रेष्ठदान" या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम राबवत वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आशीर्वाद मंगल कार्यालय, पोलीस मुख्यालय, वर्धा येथे आयोजित शिबिरात एकूण १५ जणांनी रक्तदान केले. यामध्ये २ पोलीस अधिकारी, १० पोलीस अंमलदार आणि ३ पोलीस कुटुंबीयांचा समावेश होता. रक्तदानाच्या माध्यमातून रुग्णांना जीवनदान देण्याच्या या सामाजिक उपक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

हे रक्तदान शिबिर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित करत रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे साध्य होत असल्याचे सांगितले.

रक्त संकलनाची प्रक्रिया सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या (एमजीआयएमएस) तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने पार पाडली. डॉ. देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक सहकार्य करून शिबिर यशस्वी केले.

या उपक्रमाचे नियोजन आणि समन्वय सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिबिराचे आयोजन सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडले.

पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवत रक्तदानासारख्या सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेतल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या रक्तदान शिबिरातून संकलित रक्तामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.