केळी उत्पादकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Sat 20-Jun-2026,02:38 AM IST -07:00
Beach Activities

केळी उत्पादकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

दरातील अन्याय व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

वर्धा, दि. 19 जून : विदर्भातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जळगाव, बुरहानपूर आणि इतर प्रमुख बाजारपेठांच्या तुलनेत अत्यल्प दर मिळत असल्याने तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यात केळी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करण्याच्या मागणीसाठी वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

संघाचे संयोजक डॉ. सचिन पावडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील मोठ्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी विदर्भातील केळी उत्पादकांवर होत असलेल्या आर्थिक अन्यायाची वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, जळगाव व बुरहानपूर येथील बाजारपेठांमध्ये केळीला मिळणारे दर आणि विदर्भातील बाजार समित्यांमधील दर यामध्ये मोठी तफावत आहे. परिणामी विदर्भातील केळी उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मे 2026 मधील तीव्र उष्णतेमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वाढता उत्पादन खर्च आणि कमी बाजारभाव यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.

यावेळी केळीच्या दरातील तफावतीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, शेतकऱ्यांना न्याय्य बाजारभावाची हमी मिळावी, व्यापारी कार्टेलची चौकशी व्हावी तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील केळी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे सकारात्मकपणे ऐकून घेत संबंधित मागण्या शासनाकडे पाठवून आवश्यक कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. विशेषतः केळी पिकाचा संपूर्ण जिल्ह्यासाठी पीक विमा योजनेत समावेश करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शविण्यात आली.

विदर्भ हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रदेश असून उष्णतेमुळे झालेले नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अन्यायकारक दर यामुळे केळी उत्पादकांवर दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून विदर्भातील केळी उत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चात मनोज नागपुरे, ज्ञानेश्वर मानकर, श्रीकांत देहारे, तुषार भोयर, प्रकाशसिंह बैस, घनश्याम माहुरे, श्याम माहुरे, त्र्यंबक माहुरे, जीवन माहुरे, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन गरपाळ, श्याम भेंडे, कुणाल बैस, मेघराज ढाले, नितीन मानकर, मंगेश खेरे, अनिरुद्ध पांडे, रामराव पारीसे, डॉ. निखिल ताल्हान, नरेश बकाने, मनोहर चवरे, विनोद साळवे आदी शेतकरी सहभागी झाले होते.