तळेगावात महाराजस्व समाधान व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

Sun 09-Aug-2026,09:01 PM IST -07:00
Beach Activities

तळेगावात महाराजस्व समाधान व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न -- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

वर्धा. तलेगाव. युसूफ पठाण

वर्धा छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी लोकाभिमुख कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान सुरू करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या विविध 65 योजनांच्या माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होत असून, भविष्यात नागरिकांना महसुली कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, तर प्रशासनच नागरिकांच्या दारी पोहोचेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

तळेगाव येथे महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसेच आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी खासदार रामदास तडस यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल विभागावर नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असून, शेतजमिनींची मोजणी आणि हद्द निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गावठाणातील जमिनींचे स्वामित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नगर परिषद क्षेत्रातील भूखंडांची मोजणी विनामूल्य केली जात आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करून संबंधितांना हक्काचे पट्टे देण्यात येत आहेत. पूर्वी 500 चौरस फुटांचे भूखंड दिले जात होते, आता 1,500 चौरस फुटांपर्यंत भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

2029 पर्यंत पांदनरस्त्यांचे मजबुतीकरण 

पांदनरस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 2029 पर्यंत राज्यातील सर्व पांदनरस्त्यांचे मोजमाप व सीमांकन करून रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या रस्त्यांना क्रमांक देऊन त्यांचे मजबुतीकरण केले जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

राज्यातील 53 लाख शेतकऱ्यांना 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, 45 लाख शेतकऱ्यांना 48 हजार कोटी रुपयांच्या वीजबिल माफीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतजमीन नसलेल्या मात्र शेतमजुरी करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, त्यामुळे त्यांनाही केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. वनहक्क मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांना आता 7/12 ई आणि 7/12 ई देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

‘एकलव्य’ शाळेसाठी जागा देण्याचे आश्वासन

आर्वी विधानसभा मतदारसंघातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल उभारण्याचा मानस असल्याचे आमदार सुमित वानखेडे यांनी सांगितले. यासाठी भूदान मंडळाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पांदनरस्त्यांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तळेगावात 300 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय

आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसरातील नागरिकांना उपचारासाठी वर्धा किंवा नागपूरला जावे लागू नये, यासाठी तळेगाव येथे 300 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे आमदार सुमित वानखेडे यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी आष्टी उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, यामुळे 14 गावांतील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यात 43 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना सेवा

महाराजस्व अभियानाच्या पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यात 43 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 559 पांदनरस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिली.

महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी महसूलमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, धनादेश, मंजुरीपत्रे आणि घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांकडून निवेदने स्वीकारून संबंधित प्रशासनाला त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजस्व समाधान शिबिर व महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.