युवा : परिवर्तन की आवाज’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; ग्राहकांना अतिरिक्त मुदत व हप्त्याची सुविधा देण्याची मागणी
युवा : परिवर्तन की आवाज’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; ग्राहकांना अतिरिक्त मुदत व हप्त्याची सुविधा देण्याची मागणी
वर्धा : प्रतिनिधी इरशाद शहा
वर्धा, वर्धा वीज बिल भरण्यास विलंब झाल्यास स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यपद्धती तात्काळ स्थगित करून ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याबाबत.
महावितरणकडून राज्यातील वीज ग्राहकांच्या घरांमध्ये डिजिटल/स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर मीटरबाबत अनेक ग्राहकांनी आक्षेप नोंदविले असून, काही ग्राहकांकडून वाढीव वीज बिलाबाबतही तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची प्रभावी दखल घेऊन आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे.
त्यातच वीज बिलाची निर्धारित मुदत संपल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यपद्धती राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर कार्यपद्धतीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कष्टकरी, शेतमजूर व सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वीज बिल भरणे ही ग्राहकांची जबाबदारी आहे; मात्र प्रत्येक ग्राहकाची आर्थिक परिस्थिती समान नसते. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे बिल भरण्यास काही दिवसांचा विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणतीही मानवी व व्यवहार्य सवलत न देता तात्काळ वीजपुरवठा खंडित करणे ही बाब सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.
वीज ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांवर कारवाई करताना त्यांच्या मूलभूत गरजा, आर्थिक परिस्थिती आणि सार्वजनिक हिताचा योग्य विचार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे शासनाने सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
1)वीज बिल भरण्यास विलंब झाल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यपद्धती तात्काळ स्थगित करण्यात यावी.
2)वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी वाजवी अतिरिक्त मुदत देण्याबाबत स्पष्ट निर्देश महावितरणला देण्यात यावेत.
आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांना हप्त्याने वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
3)डिजिटल/स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वाढीव वीज बिलासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची तांत्रिक व स्वतंत्र चौकशी करून आवश्यक सुधारणा करण्यात यावी.
4)वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना योग्य पूर्वसूचना व बिल भरण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याबाबत स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी.
5)सदर विषयावर शासनाने तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व वीज वितरण विभागांना करण्याचे निर्देश द्यावेत.
सदर मागण्यांबाबत शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही न केल्यास, युवा : परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांना सोबत घेऊन लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन व शासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.
सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
युवा: परीवर्तन की आवाज संघटना चे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष विशाल इचपाते जिल्हा संघटक दिनेश परचाके, वर्धा तालुका प्रमुख इरशाद शहा, उपाध्यक्ष वर्धा अमन नारायण, तेजस खडसे शुभम निमजे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.