चिंदिमाल तलावात ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला,वाघाच्या हल्ल्याचा संशय

Thu 20-Aug-2026,01:18 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तुकूम येथील ५४ वर्षीय मोरेश्वर गोपिचंद सावसाकडे हे १६ ऑगस्टपासून बेपत्ता होते. बुधवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंदिमाल येथील जंगल परिसराने वेढलेल्या तलावात त्यांचे मृतदेहाचे अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात, विशेषत वाघाच्या हल्ल्यात झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, वाघाच्या हल्ल्यामुळेच मृत्यू झाला की अन्य कारणाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोरेश्वर सावसाकडे हे मासेमारीसाठी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

त्यानंतर ते घरी परतले नसल्याने गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर चिंदिमाळ गावातील सर्व्हे क्रमांक २३ मधील तलावात त्यांचे शरीराचे अवशेष आढळले. हा तलाव जंगल परिसराने वेढलेला असून घटनास्थळ नागभीड तालुक्यातील ब्रह्मपुरी वनविभागाच्या अखत्यारीत येते.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच परिसरात वन्यप्राण्याच्या हालचालींबाबतही तपास करण्यात येत आहे.दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून वनविभागाकडूनही आवश्यक कार्यवाही केली जात आहे. वाघाच्या हल्ल्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने तपासानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.