विद्यार्थ्यांना उद्योजक घडविण्याची प्रक्रिया म्हणजेच ‘खरी कमाई’ – डॉ. पंकज भोयर
मुख्य संपदाक नावेद पठाण
बोरगाव (मेघे): सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत केवळ पुस्तकी ज्ञानापुरते शिक्षण न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रायोगिक उपक्रम राबविले जात आहेत. शाळांमधील सांस्कृतिक स्नेहसंमेलने जशी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देतात, त्याचप्रमाणे शाळेत आयोजित करण्यात येणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल व ‘खरी कमाई’ उपक्रम हे प्रभावी शैक्षणिक साधन ठरत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री तसेच वर्धा व भंडारा जिल्ह्यांचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
ते 10 जानेवारी रोजी सत्येश्वर लॉन, बोरगाव (मेघे) येथे सेंट थॉमस इंग्लिश स्कूल तर्फे आयोजित ‘किड्स फूड फेस्ट (आनंद मेळा)’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
डॉ. भोयर पुढे म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाची प्रत्यक्ष ओळख मिळते. ‘मिनी बिझनेस प्रोजेक्ट’च्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची किंमत ठरवणे, विक्री करणे, नफा-तोट्याचे गणित समजून घेणे शिकतात. यासोबतच जोखीम स्वीकारणे, सर्जनशीलता, समस्या सोडवणे, नियोजन आणि निर्णयक्षमता हे महत्त्वाचे गुण विकसित होतात.
खाद्यपदार्थांच्या स्टॉलद्वारे कोणत्या प्रसंगी कोणत्या वस्तूंची विक्री करावी, ग्राहकांशी कसा संवाद साधावा, मार्केटिंग कसे करावे, पोस्टर्स, स्लोगन्स, प्रमोशन, बार्गेनिंग व फीडबॅक घेणे अशा बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. कार्यक्रमानंतर नफा-तोट्याचे विश्लेषण करून भविष्यातील सुधारणा करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, जी व्यावसायिक जगतात अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, चेतना कांबळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष निखिल रोकडे, राजू लभाने, विलास कुलकर्णी उपस्थित होते. तसेच शाळेच्या प्राचार्या प्रीती सत्याम, संचालक विजय सत्याम, सागर फोडेकर, साध्वी सत्यमित्रा, प्रशांत पांडे, सुभदा रुद्रकार, निलोफर बक्श, लीना फोडेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या आनंद मेळ्यात सुमारे 50 विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून सहभाग नोंदविला. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा संत व रुची तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्या प्रीती सत्याम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चैताली बारई, अश्विनी गुरनुले, आनंशा श्रीवास्तव, अश्विनी नवले, संदीप जोशी, वेदांत सत्याम, संचाली भलमे, पूजा गोसटकर, शबाना शेख, पूजा ओझा, मयुरी चव्हाण, अमृता यादव आदींनी अथक परिश्रम घेतले.