देवतारे लेआऊटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम रात्रीची वाट कशाला? चक्क दिवसा घरफोडी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सेलू |वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी युसूफ पठान
सेलू शहरातील देवतारे लेआऊट परिसरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या प्रभागातील ही चौथी चोरी असून, दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यापूर्वी हातबंडी, हंडा चोरी, लोखंडी साहित्य चोरीच्या घटना घडल्या असून, आता चोरट्यांनी थेट घरात प्रवेश करून आरमारी फोडून रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की, आता ते रात्रीची वाट न पाहता दिवसा चोरी करून निर्धास्तपणे पसार होत आहेत, असे चित्र या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, देवतारे लेआऊट येथे सुनीता माजरे यांच्या घरी किरायाने राहणारे सुष्ट्री अमर भोसले दाम्पत्य व त्यांचा मुलगा राहत आहेत. अमर भोसले हे दिवसा कंपनीत नोकरीस जातात, तर त्यांची पत्नी येथील मगण संग्रहालयात बचत गटाच्या माध्यमातून काम करतात.
दि. ९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान, घर रिकामे असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. आरमारी उघडून त्यातील ४५ हजार रुपये रोख रक्कम चोरून आरोपी पसार झाले.
मुलाची शाळा सुटल्यानंतर सुष्ट्री भोसले दुपारी दोनच्या सुमारास घरी परतल्यावर घरातील वस्तू अस्ताव्यस्त दिसून आल्या. आरमारी तपासली असता त्यातील रोख रक्कम चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस तपास अधिकारी, कर्मचारी, फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाने पाहणी केली आहे.
परिसरात वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.