प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खरांगणा गोडे येथे ग्रामपंचायतीची व्यापक स्वच्छता मोहीम

Sun 11-Jan-2026,09:53 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा तालुका प्रतिनिधी इरशाद शाह

 

खरांगणा गोडे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर खरांगणा गोडे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामसेवक मा. श्री. सुधीर पुशनाके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावातील विविध समस्या शिस्तबद्ध पद्धतीने हाताळण्यात येत असून, स्वच्छता, आरोग्य व सर्वांगीण ग्रामविकासावर विशेष भर दिला जात आहे.

सध्या सुरू असलेल्या या मोहिमेत केवळ जिल्हा परिषद शाळेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत वस्ती, सार्वजनिक ठिकाणे, नाल्या तसेच मोकळ्या जागांची साफसफाई करण्यात येत आहे. गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, या उपक्रमात ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू करण्यात आलेली ही स्वच्छता मोहीम केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता पुढील काळातही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले. यामागील मुख्य उद्देश संपूर्ण गाव स्वच्छ, आरोग्यदायी व आदर्श स्वरूपात विकसित करणे हा आहे.

“फक्त शाळाच नव्हे तर संपूर्ण गाव स्वच्छ” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.