रेल्वे मार्गाने अवैध दारू तस्करी उघड : लोहमार्ग पोलिसांची धडक कारवाई, दोन महिला अटकेत

Sun 08-Feb-2026,07:41 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर :बल्लारपूर रेल्वे मागनि सुरू असलेल्या अवैध दारू तस्करीचा लोहमार्ग पोलिसांनी भांडाफोड केला असून, या कारवाईत दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण ३१ हजार ७९० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.६ फेब्रुवारी २०२६ रोजी लोहमार्ग पोलीस स्टेशन, वर्धा येथील गुन्हे अन्वेषण पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली होती की, ट्रेन क्रमांक १२७७२ रायपूर-सिकंदराबाद एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून दोन महिला थैल्यांमधून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करीत असून त्या चंद्रपूर रेल्वे स्थानकावर उतरण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाईचे नियोजन करून सापळा रचला.ट्रेन चंद्रपूर रेल्वे स्थानकात दाखल होताच पोलिसांनी जनरल डब्यात तपासणी केली. यावेळी दोन महिला संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांच्या बॅगांची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये ऑफिसर चॉईस सुप्रीम व्हिस्की' (फक्त मध्यप्रदेशात विक्रीसाठी) असा विदेशी महद्यसाठा आढळून आला.यानंतर दोन्ही महिलांना दारूसह बल्हारशाह रेल्वे स्थानकावर उतरवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजकुमारी धिरेंद्र जाट (३८) व राणीबाई गब्बर जाट (४८), दोघीही रा. धमापूर, जिल्हा जबलपूर (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून अनुक्रमे १०३ व ८४ अशा एकूण १८७ प्लास्टिक बाटल्यांचा दारूसाठा किंमत ३१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क) व ६६(१) (ख) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक नागपूर मंगेश शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे तसेच प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पंकज ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा गणेश वाघाडे, पोअं पंकज भांगे, अश्विन पनेलवार, राजेश ठाकरे, मपोअं किर्ती मिश्रा तसेच गुन्हे अन्वेषण पथकातील पोअं अखिलेश चौधरी व निलेश निकोडे यांनी केली.