बीटीएस चौकात भीषण अपघात,ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

Fri 06-Feb-2026,08:08 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर .

बल्लारपूर :गोंडपिपरीहून चंद्रपूरकडे मोपेडने जात असताना बल्लारपूर शहरातील बीटीएस चौकात भीषण अपघात घडला. या अपघातात निलिमा देवराव रोहनकर (३८), रा. छोटा बाजार वॉर्ड, चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती अपघातात जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रोहनकर दाम्पत्य मोपेड क्रं एमएच ३४ सीपी २४१७ ने प्रवास करत असताना ओव्हरटेक करत असलेल्या ट्रकने धडक दिली. धडकेनंतर ट्रकचे मागील चाक निलिमा रोहनकर यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात पती उसळून पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. संबंधित ट्रक क्रं एमएच ३३ टी ३८३६ लोहखनिज घेऊन घुग्गुसकडे जात असल्याचे सांगितले जाते.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

मृत निलिमा रोहनकर व त्यांचे पती काल गोंडपिपरी तालुक्यातील जयरामपूर येथे घराच्या वास्तुसाठी गेले होते. त्यांच्या पश्चात २१, १८ व १६ वर्षांच्या तीन मुली आहेत. मोठ्या मुलीचा मागील महिन्यात साक्षगंध पार पडला असून तिचा विवाह येत्या ७ मे रोजी होणार आहे. या दुर्घटनेमुळे रोहनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मूतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला आहे.प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मदन दिवटे व पोलीस हवालदार यशवंत कुमरे करीत आहेत.