जि.प. शाळा आजनडोह येथे माजी विद्यार्थी मेळावा व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Sun 19-Apr-2026,11:53 PM IST -07:00
Beach Activities

जि.प. शाळा आजनडोह येथे माजी विद्यार्थी मेळावा व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

 

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

कारंजा (घा.) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आजनडोह येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन रमधम होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख संजय ढोले, सरपंच अनिल डिग्रसे तसेच महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापक पूनम लाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख संजय ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक प्रभाकर मुन्ने यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन संजय ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी शिक्षक आशिष रमधम यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मान्यवरांच्या मार्गदर्शनासह माजी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे मेळावा आनंददायी वातावरणात पार पडला.

दरम्यान, गावचे सरपंच अनिल डिग्रसे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप केले.

रामनवमी निधीतून शाळेसाठी डिजिटल बोर्ड

विशेष म्हणजे, आजनडोह गावातील नवयुवकांनी यंदा रामनवमीची मिरवणूक न काढता त्यासाठी जमा झालेली ३५ हजार रुपयांची वर्गणी शाळेसाठी डिजिटल बोर्ड खरेदीसाठी देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमाबद्दल रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष महेश ढोले व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. राखी रमधम, रोशनी कडवे, राधा कथले, धोटे मॅडम, प्रदीप हिंगवे, जगदीश शिवणे, योगेश रबडे, सूरज डिग्रसे, मुकुल हिंगवे, लकी गाखरे, भूजल कालभूत, वेदांत गाखरे, आदित्य रमधम, हिमांशू डिग्रसे तसेच ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे सहकार्य लाभले.