स्पर्धेत प्रथम येणारा खेळाडूच खरा रोल मॉडेल : डॉ. पंकज भोयर

Sun 19-Apr-2026,12:13 AM IST -07:00
Beach Activities

स्पर्धेत प्रथम येणारा खेळाडूच खरा रोल मॉडेल : डॉ. पंकज भोयर

आंतरशालेय कराटे स्पर्धेतील पदक विजेत्यांचा गौरव सोहळा संपन्न

 

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा | समाज निरोगी ठेवण्यासाठी सुजाण नागरिकांची गरज असते. सशक्त नागरिकांमुळेच सशक्त समाजाची निर्मिती होते. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आत्मसुरक्षेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. कराटे या खेळामुळे आत्मविश्वास वाढतो आणि त्याच्या बळावर अशक्य वाटणारी कार्येही शक्य होतात. आजच्या स्पर्धात्मक युगात जो स्पर्धेत टिकून राहतो तोच यशस्वी ठरतो. खेळाडूंनी आपले स्थान टिकवण्यासाठी कठोर परिश्रम आणि दृढ आत्मविश्वास जोपासणे आवश्यक आहे. प्रत्येक खेळाडूने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. या स्पर्धात्मक युगात जो प्रथम येतो तोच खरा रोल मॉडेल ठरतो, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

ते १८ एप्रिल रोजी शिववैभव सभागृहात आयोजित आंतरशालेय कराटे स्पर्धेतील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम कराटे-डो स्पोर्ट्स असोसिएशन, वर्धा जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश इखार, उपाध्यक्ष मोहन मोहिते, कोषाध्यक्ष विजय सत्याम, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभुदय मेघे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, संदीप चिचाटे, प्रदीप बजाज, पवन तिजारे, अर्चनाताई भोंमले, विद्याताई कळसाईत, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर पाटील, पृथ्वीराज शिंदे, संतोष सेलुकर, संजय जैस्वाल, अंबुज पांडे, राजू बानमारे, कृष्णा जोशी, नितीन जाधव, इंद्रजीत वाघमारे, अमित कावडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी राज्यस्तरीय सब-ज्युनिअर, कॅडेट व ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिपसाठी वर्धा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी नागपूरचे कराटे प्रशिक्षक व कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय पंच शिहान अनवर अली यांनी पार पाडली. तसेच डिजिटल कार्य अमरावती येथील सेन्साई वेदांत डाहे व सेन्साई ध्रुव बांगरे यांनी सांभाळले.

कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सेन्साई काशिनाथ रघाटाटे, सचिव शिहान मंगेश भोंगाडे व कोषाध्यक्ष सौ. मनीषा राऊत यांनी केले. प्रस्तावना सेन्साई निलेश राऊत, सूत्रसंचालन सेन्साई पूजा गोसटकर तर आभार प्रदर्शन सेन्साई अभिषेक सोनवणे यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक विजेते देवांशु लाखे, नैतिक राऊत, मोहिनी चुटे, पियूष सिंग, कैवल्य सागरकर, तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी गौरव असानी यांचा सत्कार करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या कु. रुचिका ढेंबरे यांचाही गौरव करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या पियूष हावलदार, समीर देवतळे, अर्णव लोखंडे, साहिल तेलहांडे, भार्गव खेवले, मधुरा गावंडे, स्नेहा बलवीर या खेळाडूंना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.