दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिसांची कडक कारवाई, मोटारसायकल जप्त; गुन्हा दाखल

Sun 19-Apr-2026,11:16 PM IST -07:00
Beach Activities

दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिसांची कडक कारवाई, मोटारसायकल जप्त; गुन्हा दाखल

 

वर्धा | प्रतिनिधी (युसूफ पठाण)

 

वर्धा दि. 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.00 वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार बजाज चौक परिसरात वाहतूक शाखेकडून नाकाबंदी सुरू होती. यावेळी एक हिरो होंडा मोटारसायकल (क्र. MH 32 AY 9334) अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवताना आढळून आली.

सदर वाहन चालकाला गाडी व्यवस्थित चालवता येत नसल्याचे लक्षात येताच वाहतूक अंमलदार एएसआय धीरज पांडे यांनी त्याला थांबवून चौकशी केली. यावेळी चालकाच्या तोंडातून दारूचा तीव्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. त्याने आपले नाव प्रदीप दशरथ कुंभारे (वय 40, रा. रामनगर, वर्धा) असे सांगितले.

तपासणीदरम्यान त्याच्या रक्तात तब्बल 404 एमजी अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धीरज पांडे, पोलीस हवालदार मुन्ना तिवारी, दिलीप कामडी व प्रदीप कोहळे यांनी संयुक्तपणे केली.

वाहतूक शाखेचे आवाहन:

दारू पिऊन वाहन चालवू नये. असे केल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते आणि स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होतो. नियमांचे पालन करा आणि सुरक्षित राहा.