रेल्वे ट्रॅक ठरतोय मृत्यूचा सापळा,चनाखा वनक्षेत्रात पुन्हा बिबट्याचा बळी

Sun 12-Apr-2026,12:03 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : राजुरा वन परिक्षेत्र मधील चनाखा वनक्षेत्रातून जाणारा बल्लारशाह–काझीपेठ हा दक्षिण मध्य रेल्वे ट्रॅक वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आज ११ एप्रिल सकाळी सुमारे साडे आठच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत दीड वर्षांच्या मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला

विहिरगाव उपवनक्षेत्रातील चनाखा नियतवनक्षेत्राच्या कक्ष क्रमांक १६० मधून रेल्वे लाईन जात असून, हा भाग वन्यप्राण्यांच्या नियमित वावराचा आहे. मात्र, या ठिकाणी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. यापूर्वीही वाघ, बिबट, अस्वल, चितळ आदींसह वन्यजीवांचा या ट्रॅकवर बळी गेला आहे.

आजच्या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. पी. तेलंग यांनी शवविच्छेदन केले.

दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रेल्वे प्रशासन व वनविभागाने समन्वय साधून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.