कारंज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

Mon 20-Apr-2026,12:00 AM IST -07:00
Beach Activities

कारंज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

 

नावेद पठाण मुख्य संपादक 

कारंजा (घा.) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे १४ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली.

हा कार्यक्रम बुद्धिस्ट एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समिती, संबोधी सोशल फोरम, भारतीय बौद्ध महासभा, मराठा सेवा संघ शाखा कारंजा, नागरी समस्या संघर्ष समिती तसेच राष्ट्रीय मुस्लिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव गाडगे होते. प्रमुख व्याख्याता म्हणून प्रतीक्षा दापुरकर उपस्थित होत्या. यावेळी प्रेमदास मोहोड, रनाताई ठुणुकले (नागपूर), ज्ञानेश्वर काकडे, मनोज वानखडे, श्रीराम इंगळे, विलासराव वानखडे, विनोद चाफले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रतीक्षा दापुरकर यांनी “फुले-शाहू-आंबेडकर यांच्या १०८ वर्षांच्या संघर्षा”वर सविस्तर मार्गदर्शन करत त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला परिणाम अधोरेखित केला. अंधश्रद्धेला बळी न पडता संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान शंकरराव गाडगे यांनी महामानवांना आदरांजली अर्पण केली. तसेच सांस्कृतिक भवनाच्या दानदात्या व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सामाजिक कार्यासाठी पुढेही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आनंदी राजेंद्र इंगळे यांनीही आपल्या भाषणातून महामानवांना अभिवादन केले.

यावेळी अंध-अपंग प्रहार संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ हिंगवे, मधुसूदन डोबले व हरी भजन बिरगडे यांचा सन्मानपत्र व संविधानाची प्रत देऊन गौरव करण्यात आला.

जयंतीनिमित्त कारंजा शहरातून भव्य शांतता रॅली काढण्यात आली. रॅलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आगमन झाल्यानंतर महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करून तिचे विसर्जन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदा नागले यांनी केले, तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर काकडे यांनी मांडले. मनोज वानखडे यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलेश गजभिये, अनिकेत विघ्ने, मदन नागले, प्रशांत सोमकुवर, जितेंद्र गाडगे, जयश्री गाडगे, रामदास तायडे, दुर्गा कांबळे, वनमाला माहुरे, रवी बागडे, किरण नागले, गजानन बोरकर व संदीप ऊके यांचे सहकार्य लाभले.