वर्धा जिल्ह्यात राज्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू,शासकीय कार्यालये ओस; नागरिकांच्या कामकाजावर परिणाम
वर्धा जिल्ह्यात राज्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू, शासकीय कार्यालये ओस; नागरिकांच्या कामकाजावर परिणाम
प्रतिनिधि – युसूफ पठाण वर्धा
वर्धा जिल्ह्यात आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाल्याने शासकीय कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य-निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे.
आज सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मचारी संघटनांनी जोरदार धरणे आंदोलन केले. “मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला.
दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने अनेक कार्यालये ओस पडली आहेत. परिणामी नागरिकांची दैनंदिन कामे रखडली असून प्रमाणपत्रे, नोंदी, तसेच विविध शासकीय योजनांसाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मागण्यांसंदर्भात अनेक वेळा मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले; मात्र चर्चेसाठी वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यभर या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.