एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कार्यशाळा व ‘संवाद सेतू’ कार्यक्रम संपन्न
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कार्यशाळा व ‘संवाद सेतू’ कार्यक्रम संपन्न
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
कारंजा ( घा )महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने तसेच सिट्रस इस्टेट, तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फुलशेती, फळशेती व भाजीपाला लागवड विषयक विविध योजनांची माहिती देणारी कार्यशाळा व ‘संवाद सेतू’ कार्यक्रम पंचायत समिती, कारंजा येथे उत्साहात पार पडला.
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सिंधुरागिरी फाउंडेशन, नागपूरचे संचालक विजय पुंडेकर यांनी शेतकऱ्यांना अळिंबी (मशरूम) लागवडीबाबत सखोल मार्गदर्शन केले. अळिंबी लागवडीचा खर्च, तांत्रिक बाबी तसेच विविध शासकीय विभागांकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या संधी यांची माहिती त्यांनी दिली. यानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे समाधान करण्यात आले.
त्यानंतर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी अर्जुन पावडे यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत उपलब्ध विविध अनुदानित घटकांबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये संत्रा पुनरुज्जीवन, फार्म गेट पॅक हाऊस, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, तसेच फुलशेती, मसाला पिके व सुगंधी वनस्पती लागवड यांचा समावेश होता.
तालुका कृषी अधिकारी सुजाता कांबळे यांनी इंडो-इस्राईल पद्धतीने संत्रा लागवडीविषयी माहिती दिली. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करण्याचे आवाहनही शेतकऱ्यांना करण्यात आले.
या कार्यक्रमाला कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) वाघमारे, उपकृषी अधिकारी तायडे तसेच सर्व सहाय्यक कृषी अधिकारी व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी सीमा चाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तायडे यांनी मानले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.