गाडीचा कट मारल्याच्या किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला धारदार हत्याराने युवकाची हत्या आरोपी फरार
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावात रविवारी १९ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाग मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कट मारल्याच्या किरकोळ वादातून एका युवकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
मृतक वैभव साईनाथ आडे वय २० असे असून, आरोपी परिमल अंकुश झाडे वय २० वर्षे याच्यासोबत त्याचा वाद झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, वैभवने आपल्या दुचाकीने आरोपीला कट मारल्याच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणातच तीव्र होऊन हिंसक स्वरूप धारण करत मारामारीत बदलला.
दरम्यान, संतापाच्या भरात आरोपी परिमल अंकुश झाडे याने वैभववर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी परिमल अंकुश झाडे हा घटनानंतर फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेनंतर वढोली गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.