काजलसरा प्रकरण पेटले; न्यायासाठी वर्ध्यात भीम आर्मीचा एल्गार, प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक
काजलसरा प्रकरण पेटले; न्यायासाठी वर्ध्यात भीम आर्मीचा एल्गार, प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक
वर्धा शहर प्रतिनिधी अमन नारायने
वर्धा वर्धा काजलसरा येथे १५ एप्रिल रोजी घडलेल्या कथित हिंसाचार प्रकरणात न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भीम सैनिकांवर झालेल्या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी वर्ध्यात भीम आर्मी (भारत एकता मिशन) व विविध आंबेडकरी संघटनांनी तीव्र धरणे आंदोलन सुरू केले आहे. गांधी पुतळा, सिव्हिल लाईन परिसर आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात काजलसरा गावातील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे.
आज आंदोलनादरम्यान भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या “तीन माकड” प्रतीकाचा वापर करत प्रशासनाच्या कथित मौनधारणेचा निषेध व्यक्त केला. “अन्याय दिसत असूनही प्रशासन डोळेझाक करत आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
भीम आर्मीचे जिल्हा संघटक आशीष सलोड़कर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, वारंवार निवेदने देऊनही काजलसरा प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळत नसल्याची भावना जनतेमध्ये वाढत असून संताप उफाळून आला आहे.
भीम आर्मीचे प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील यांनी लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई, संबंधित आरोपींना तात्काळ अटक, गावकऱ्यांवर दाखल कथित खोटे गुन्हे मागे घेणे, नागरिकांना संरक्षण देणे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.
“न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे हटणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या वर्धा जिल्ह्यात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदनावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे (रावण), महिला जिल्हाध्यक्ष शीतल पवार, प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील, जिल्हा संघटक आशिष सालोडकर, सामाजिक कार्यकर्ते अनुराग डोंगरे यांच्यासह काजळसरा गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.