दीड वर्षांपूर्वीची दुचाकी चोरी उघड; अट्टल गुन्हेगार वर्धा पोलिसांच्या जाळ्यात
दीड वर्षांपूर्वीची दुचाकी चोरी उघड; अट्टल गुन्हेगार वर्धा पोलिसांच्या जाळ्यात
वर्धा | प्रतिनिधि इरशाद शाह
वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (डीबी पथक) कौशल्यपूर्ण तपास करत दीड वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मोपेड दुचाकी शोधून काढली आहे. या प्रकरणी यवतमाळ कारागृहात बंद असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी राजेश महादेवराव घोडे (वय ५४, रा. भीमनगर, वर्धा) यांनी आपली मोपेड अॅक्टिव्हा (क्र. MH 32 AT 4333) बजाज चौक परिसरातील मोहता जिन येथे घराच्या अंगणात उभी केली होती. २२ नोव्हेंबर २०२४ च्या रात्री अज्ञात चोरट्याने सुमारे ४५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७५/२०२४, कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस हवालदार प्रशांत वंजारी यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर दुचाकी यवतमाळ येथील शुभम धोंगडे याच्याकडे आहे. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करून यवतमाळ येथे जाऊन दुचाकी जप्त केली. चौकशीदरम्यान शुभमने ही दुचाकी सतीश उर्फ शेंबड्या उर्फ मुंगश्या बाबाराव मडावी (वय २५, रा. राळेगाव, जि. यवतमाळ) याच्याकडून २५ हजार रुपयांत खरेदी केल्याचे सांगितले. सतीशने “वडील दवाखान्यात भरती आहेत” असे खोटे कारण सांगून दुचाकी विकल्याचे उघड झाले.
तपासात पुढे असेही निष्पन्न झाले की, मुख्य आरोपी सतीश मडावी हा सध्या यवतमाळ जिल्हा कारागृहात एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध आहे. त्याच्यावर वर्धा जिल्ह्यात चोरी व घरफोडीचे ८ गुन्हे, तर यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गृहविभागाच्या परवानगीनंतर वर्धा पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन रीतसर अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार संतोष ताले व पोनि विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोउपनि शरद गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, अमोल आतराम, वैभव जाधव, श्रावण पवार व शशिकांत मुंडे यांचा समावेश होता.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी करीत आहेत.