फुटलेली पाईपलाईन, रस्त्यावर पाण्याचा पूर! खरांगणा गोडे ग्रामपंचायत झोपेत?

Mon 04-May-2026,03:51 AM IST -07:00
Beach Activities

फुटलेली पाईपलाईन, रस्त्यावर पाण्याचा पूर! खरांगणा गोडे ग्रामपंचायत झोपेत?

वर्धा तालुका प्रतिनिधी इरशाद शहा

खरांगणा गोडे येथे मागील २–३ दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर मुख्य रस्त्यावर पाईपलाईन फुटून पाणी सतत वाहत आहे. यामुळे रस्त्यावर अक्षरशः पाण्याचा पूर आलेला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे भीषण पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांना एक दिवसाआड पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत, तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत व संबंधित ग्रामसेवकांना याबाबत माहिती दिली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. “धूपकाळ” असल्याचे कारण देत दररोज पाणीपुरवठा टाळला जातो, मात्र फुटलेल्या पाईपमधून सुरू असलेली पाण्याची नासाडी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

या प्रकारामुळे नागरिकांचा संताप वाढत असून, “पाणी वाचवा”चे संदेश देणारे प्रशासन प्रत्यक्षात किती गंभीर आहे, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन पाईपलाईनची दुरुस्ती करावी व पाण्याची होणारी नासाडी थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.