अल्लीपूर स्वागत प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे ढीग; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Sat 30-May-2026,04:45 AM IST -07:00
Beach Activities

अल्लीपूर स्वागत प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे ढीग; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे

अल्लीपूर-धोत्रा हायवे रोडवरील स्वागत प्रवेशद्वार (वेलकम गेट) परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील विविध भागांतील कचरा स्वागत प्रवेशद्वाराजवळील शेत परिसरात टाकला जात असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून पर्यावरणीय प्रदूषणात वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर चंभारे व प्रल्हाद चंभारे यांच्या शेतालगतच्या जागेत गावातील कचरा, उरलेले अन्न तसेच इतर टाकाऊ वस्तू सातत्याने फेकल्या जात आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून डासांचा प्रादुर्भावही झपाट्याने वाढत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात शेतकरी प्रल्हाद चंभारे यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कचऱ्याचे ढीग हटविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शेतकरी ईश्वर चंभारे यांनी प्रशासनाकडे तातडीने परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित ठिकाणी "येथे कचरा टाकण्यास मनाई आहे" असा इशारा देणारा फलक लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, वाढती अस्वच्छता आणि आरोग्यविषयक धोके लक्षात घेता प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.