मनरेगामध्ये मोठा गैरव्यवहार? देवळी तालुक्यातील ग्रामपंचायत अकोलीतील प्रकरण चर्चेत

Thu 28-May-2026,04:28 AM IST -07:00
Beach Activities

मनरेगामध्ये मोठा गैरव्यवहार? देवळी तालुक्यातील ग्रामपंचायत अकोलीतील प्रकरण चर्चेत

वर्धा तालुका प्रतिनिधी इरशाद शहा

वर्धा : देवळी तालुक्यातील ग्रामपंचायत अकोली येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत गंभीर गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या चौकशीकडे लागले आहे.

तक्रारीनुसार, ग्रामपंचायतमधील रोजगार सेविका सौ. रक्षिता प्रफुल मून यांनी स्वतःच्या नावाने मनरेगाच्या निधीची उचल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या आईच्या नावाने — ज्या गावात वास्तव्यास नसल्याचा दावा करण्यात आला आहे — जॉब कार्ड तयार करून शासनाचा निधी उचलण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय पती प्रफुल जनार्दन मून, मुलगा अनिकेत प्रफुल मून, माया ताराचंद कांबळे तसेच इतर निकटवर्तीयांच्या नावाने मस्टर रोलमध्ये नोंदी करून प्रत्यक्ष काम न करता मजुरी दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदाराकडे जॉब कार्ड, मस्टर रोल, पेमेंट डिटेल्स तसेच इतर कागदपत्रीय पुरावे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे देवळी येथील आमदारांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चौकशीतून नेमके काय समोर येणार आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.