विनंती बदलीसाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या एसटी विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाविरुद्ध कारवाई
विनंती बदलीसाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या एसटी विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाविरुद्ध कारवाई
वर्धा तालुका प्रतिनिधी | इरशाद शहा
वर्धा : विनंती बदली करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा आगारात कार्यरत असून प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्राम येथे उपचार घेतले होते. डॉक्टरांनी त्यांना बेडरेस्टचा सल्ला देत चालणे व फिरणे टाळण्यास सांगितल्याने ते डिसेंबर २०२५ पासून वैद्यकीय रजेवर होते.
तक्रारदारांची नियुक्ती वर्धा आगार, रामनगर येथे असल्याने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी विभाग नियंत्रक, विभागीय कार्यालय, सेवाग्राम रोड, वर्धा यांच्याकडे विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. बदलीच्या संदर्भात त्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सचिन ज्ञानेश्वर चांदेकर यांची भेट घेतली असता, वर्कशॉप व विभागीय कार्यालय येथे बदली करून देण्यासाठी त्यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात दि. १२ मे २०२६ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर १३ व १४ मे रोजी लाच सापळा कारवाई करण्यात आली. मात्र आरोपीने १४ मे रोजी लाच स्वीकारण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दि. २५ मे २०२६ रोजी विभाग नियंत्रक, विभागीय कार्यशाळा, सेवाग्राम रोड, वर्धा यांची पडताळणी करण्यात आली असता त्यांनी कोणतीही लाच मागणी केली नसल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वरिष्ठ लिपीक सचिन ज्ञानेश्वर चांदेकर (वय ४८), रा. विभागीय कार्यालय, सेवाग्राम रोड, वर्धा यांना कार्यालयातून ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून रेडमी कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
आरोपी सचिन ज्ञानेश्वर चांदेकर, पद वरिष्ठ लिपीक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, सेवाग्राम रोड, वर्धा (वर्ग-३) यांच्याविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई दिगांबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर तसेच माधुरी बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत राकेश साखरकर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. वर्धा, पोलीस निरीक्षक कान्होपात्रा बन्सा, संदीप मुपडे तसेच पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०७१५२-२४३८४४, व्हॉट्सअॅप क्रमांक ७५१७६११०६४ किंवा पोलीस उपअधीक्षक यांच्या मोबाईल क्रमांक ७३५०९०२१०० वर संपर्क साधावा. तसेच [email protected] या ई-मेलवर तक्रार नोंदवावी.