आर्वीत कोर्टातील मुद्देमाल चोरी प्रकरण उघड; १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mon 18-May-2026,04:41 AM IST -07:00
Beach Activities

आर्वीत कोर्टातील मुद्देमाल चोरी प्रकरण उघड; १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा / आर्वी | प्रतिनिधी : युसूफ पठाण

आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील कोर्टातील मुद्देमाल चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कोर्टातील मुद्देमाल चोरी करून नेला होता. याप्रकरणी आर्वी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ९९७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार विशाल उर्फ घनश्याम उर्फ बीडी ज्ञानेश्वर भांगे (वय २४, रा. जनता नगर, आर्वी) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून १० जुने सिलिंग फॅन, एक सबमर्सिबल मोटर पंप, तांब्याच्या तारा, विविध कंपनीच्या ९ ट्रॅक्टर बॅटऱ्या तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली अॅक्टीव्हा मोपेड (एमएच ३२ एटी ९८९२) असा एकूण १ लाख २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चंद्रकांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस कर्मचारी निलेश पेटकर, अमर हजारे, अंकुश निचत, दिगांबर रुईकर, रुषीकेश घंगारे, अमोल गोरटे, सुरज बावरी, निलेश करडे, मनोज आसोले, सुरज रिठे व सागर पाचोडे यांनी सहभाग घेतला.

पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.