एल निनोमुळे पेरणीसाठी घाई करू नये – मंडळ कृषी अधिकारी निलेश सुपारे यांचे आवाहन

Sun 24-May-2026,10:12 PM IST -07:00
Beach Activities

एल निनोमुळे पेरणीसाठी घाई करू नये – मंडळ कृषी अधिकारी निलेश सुपारे यांचे आवाहन

वडनेर परिसरात गावोगावी प्रचार व प्रसार मोहीम

 

 वडनेर प्रतिनिधि नाजिम  खान 

 

वडनेर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने वडनेर परिसरात खरीप हंगामपूर्व सभांचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत.

याच अनुषंगाने वडनेर येथील पद्माकर भगत यांच्या शेतात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी निलेश सुपारे, उपकृषी अधिकारी जितेंद्र येळेकर, राम बावकर, दारोडा येथील सहाय्यक कृषी अधिकारी नंदन मिसाळ, वडनेरच्या सहाय्यक कृषी अधिकारी कु. पूजा बोंदर, करण धोत्रे, समूह सहाय्यक बागवे तसेच बायर कंपनीचे यश रेवतकर उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी नंदन मिसाळ यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन, माती परीक्षण, जमिनीची मशागत, बियाण्यांची निवड, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, उगवण क्षमता तपासणी तसेच बीजप्रक्रियेची प्रात्यक्षिके आणि त्याचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली.

सहाय्यक कृषी अधिकारी करण धोत्रे यांनी खरीप पिकांची लागवड ते काढणीपर्यंतचे नियोजन तसेच बीबीएफ यंत्राद्वारे लागवडीचे फायदे यावर मार्गदर्शन केले.

उपकृषी अधिकारी जितेंद्र येळेकर यांनी दशपर्णी अर्क, जीवामृत, निंबोळी अर्क आणि निमास्त्र तयार करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर केले.

उपकृषी अधिकारी राम बावकर यांनी रासायनिक खतांचा कमी वापर व त्याचे फायदे, बदलत्या हवामान परिस्थितीत एल निनोचा शेतीवर होणारा परिणाम, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन, रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

कु. पूजा बोंदर यांनी कपाशी पिक व्यवस्थापन आणि गांडूळ खत निर्मितीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी निलेश सुपारे यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाची शक्यता असल्याचे सांगितले. एल निनोमुळे मान्सून उशिरा सुरू होणे, पावसात मोठा खंड पडणे किंवा अचानक अतिवृष्टी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पिकांच्या उगवण व उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी घाई न करता जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.