शिक्षणाचा सन्मान हा प्रगती आणि आत्मसन्मानाचे सर्वात प्रभावी शस्त्र – प्राचार्या प्रीती सत्यम
शिक्षणाचा सन्मान हा प्रगती आणि आत्मसन्मानाचे सर्वात प्रभावी शस्त्र – प्राचार्या प्रीती सत्यम
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
बोरगाव (मेघे)“शिक्षण आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेण्याची क्षमता देते. हे असे माध्यम आहे, जे विचार करण्याची, संवाद साधण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढवून आपल्याला आत्मनिर्भर बनवते. शिक्षण हेच माणसाच्या आयुष्यात सन्मान, प्रगती आणि आत्मसन्मानाचा खरा मार्ग दाखवणारे प्रभावी साधन आहे,” असे प्रेरणादायी विचार सेंट थॉमस स्कूलच्या प्राचार्या प्रीती सत्यम यांनी व्यक्त केले.
त्या २३ मे रोजी बोरगाव येथील ‘सत्येश्वर हॉल’मध्ये सेंट थॉमस स्कूलच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘गुण गौरव समारंभा’त अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच यश मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळी गुणवत्ता असते, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून सतत पुढे जात राहावे.
सेंट थॉमस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वर्धा यांच्या वतीने आयोजित हा भव्य समारंभ सत्याश्रमच्या सत्येश्वर हॉलमध्ये उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही, आदर्श शिक्षक मोहन मोहिते, समाजसेवक राजू लभाने, साध्वी सत्यमित्राजी तसेच शाळेचे संचालक विजय सत्यम आणि सागर फोडेकर उपस्थित होते.
या गौरवशाली समारंभात दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच शाळेत अव्वल स्थान पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या समृद्धी डोबले, द्वितीय क्रमांकाचे आदित्य साटोने आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या धनश्री तायडे यांना ट्रॉफी व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन प्रोत्साहन देण्यात आले. या आनंददायी क्षणी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि पालकांच्या डोळ्यांतील अभिमान स्पष्ट दिसून येत होता.
कार्यक्रमातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणीच्या बळावर जीवनातील कोणतेही ध्येय गाठता येते. केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून चांगले संस्कार आणि शिस्तही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रद्धा संत यांनी केले. शाळेतील शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण समारंभ संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे आणि शैक्षणिक कार्याचे मनापासून कौतुक केले.