वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ निमित्त सामूहिक शपथ ग्रहण

Thu 21-May-2026,06:39 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ निमित्त सामूहिक शपथ ग्रहण

वर्धा  प्रतिनिधी : इरशाद शहा

वर्धा : वर्धा भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत Rajiv Gandhi यांच्या पुण्यतिथीनिमित्त २१ मे हा दिवस देशभरात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून पाळण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध पोलीस कार्यालये व पोलीस ठाण्यांमध्ये सामूहिक शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात विविध शाखांचे प्रमुख, पोलीस अधिकारी तसेच अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी देशाची अहिंसा, शांतता व सहिष्णुतेची परंपरा जपण्याची तसेच सर्व प्रकारच्या दहशतवाद आणि हिंसाचाराचा संघटितपणे मुकाबला करण्याची शपथ घेतली.

वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासोबतच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, सर्व पोलीस ठाणे तसेच त्यांच्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या-आपल्या पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येऊन ही प्रतिज्ञा घेतली.

या उपक्रमाचे नियोजन पोलीस अधीक्षक कार्यालयातील मानव संसाधन (कल्याण) शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे व त्यांच्या पथकाने केले. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस दल सदैव कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.