“जनता त्रस्त... सरकार मस्त!”

Thu 21-May-2026,06:22 AM IST -07:00
Beach Activities

“जनता त्रस्त... सरकार मस्त!”

महागाई व इंधनटंचाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

वर्धा | प्रतिनिधी : अतहर शेख

वाढती महागाई, इंधनटंचाई तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कथित निष्क्रिय धोरणांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी युवक कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी

“झोपा काढा... झोपा काढा... मोदी सरकार झोपा काढा!”,

“महागाई कमी करा... जनतेला दिलासा द्या!”,

तसेच

“शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्या!”

अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असून पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.