पवनार-वर्धा दरम्यान नागपूर-नांदेड एसटीचा भीषण अपघात; रोड रोलरमुळे बस शेतात घुसली, जीवितहानी टळली
पवनार-वर्धा दरम्यान नागपूर-नांदेड एसटीचा भीषण अपघात; रोड रोलरमुळे बस शेतात घुसली, जीवितहानी टळली
प्रतिनिधी : युसुफ पठाण | वर्धा
वर्धा : नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा पवनार ते वर्धा दरम्यान शुक्रवारी भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक रोड रोलर आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट शेतात जाऊन धडकली. या अपघातात काही प्रवासी तसेच एका दुचाकी वाहनचालकाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. त्यानंतर ॲम्बुलन्सच्या सहाय्याने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या मदतकार्यात टायगर ग्रुप वर्धा जिल्हाचे सुनील मंगरूळकर, निलेश गोत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथील ग्रामस्थांनी तत्परतेने सहभाग घेतला. त्यांनी घटनास्थळी मदतकार्य करत जखमींना सुरक्षितस्थळी हलविण्यास सहकार्य केले.
सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.