शहरातील बाजारपेठ व प्रमुख चौकांची नगर परिषद अध्यक्षांकडून पाहणी
शहरातील बाजारपेठ व प्रमुख चौकांची नगर परिषद अध्यक्षांकडून पाहणी
वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा : शहरातील विविध बाजारपेठांमधील नागरी समस्या जाणून घेण्यासाठी नगर परिषद अध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ यांनी प्रत्यक्ष पाहणी मोहीम राबवली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठाकरे मार्केट, सोशलिस्ट चौक, निर्मल बेकरी परिसर, अंबिका हॉटेल परिसरासह विविध व्यापारी भागांची सविस्तर पाहणी केली.
डॉ. पांगुळ यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला तसेच परिसरातील समस्या जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि कचरा प्रदूषण या प्रमुख समस्यांची त्यांनी नोंद घेतली.
यावेळी बोलताना डॉ. सुधीर पांगुळ म्हणाले, “हे आपले शहर असून ते स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” शहरातील ट्रॅफिक कोंडी कमी करणे, अतिक्रमण हटविणे आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून काम सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर परिषद अध्यक्षांच्या या पाहणी मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांच्या सक्रिय भूमिकेचे स्वागत केले आहे. नगर परिषद प्रशासनाकडून लवकरच संबंधित समस्यांवर कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.