वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

Tue 19-May-2026,10:59 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गंभीर खुनाच्या प्रकरणाचा छडा लावत वर्धा शहर पोलिसांनी तत्पर कारवाई करत मुख्य आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली. इतवारा बाजार परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इतवारा बाजार येथील रहिवासी नागेश जानरावजी यांच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दिनांक १८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५० वाजताच्या दरम्यान घडली. अवधूत फुलझिले (वय ३५, रा. फ्रुट मंडी, इतवारा बाजार, वर्धा) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी मुख्य आरोपी रवी गोविंद गंगावणे (वय ४२, रा. इतवारा बाजार, वर्धा) याला १९ मे २०२६ रोजी पहाटे ५.०२ वाजताच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली.

ही कारवाई वर्धा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार इम्रान खिलची (बकल क्रमांक ९५५), पोलीस हवालदार खेमसिंग कोहचडे (बकल क्रमांक ६०३) तसेच पोलीस शिपाई विजय खाडे (बकल क्रमांक ५६८) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सदर कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद माकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वर्धा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.