वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे ‘फॉरेन्सिक मेडिसिन’ कार्यशाळेचे आयोजन

Thu 21-May-2026,06:32 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे ‘फॉरेन्सिक मेडिसिन’ कार्यशाळेचे आयोजन

प्रतिनिधी : इरशाद शहा वर्धा 

वर्धा गुन्ह्यांचा तपास अधिक अचूक, शास्त्रोक्त आणि गतिमान पद्धतीने व्हावा तसेच न्यायालयात गुन्हेगारांविरुद्ध सबळ पुरावे सादर करून कठोर शिक्षा मिळवून देता यावी, या उद्देशाने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी विशेष ‘फॉरेन्सिक मेडिसिन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलचे फॉरेन्सिक मेडिसिन तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्यायवैद्यकशास्त्राशी संबंधित महत्त्वपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले.

कार्यशाळेदरम्यान डॉ. खांडेकर यांनी स्लाईड शो आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून फॉरेन्सिक मेडिसिनच्या साहाय्याने गुन्ह्यांची उकल कशी करता येते, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विशेषतः पोक्सो (POCSO) अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वैद्यकीय पुराव्यांचे महत्त्व, पीडितांच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान घ्यावयाची काळजी तसेच पुरावे संकलनाची प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले.

तसेच गंभीर व प्राणघातक जखमांच्या प्रकरणांमध्ये वापरण्यात आलेल्या हत्यारांचा अंदाज, जखमेचे स्वरूप आणि त्यावरून गुन्ह्याची तीव्रता कशी सिद्ध करता येते, याविषयीही त्यांनी तांत्रिक माहिती दिली. भाजलेल्या जखमा आणि मृत्यूच्या घटनांमध्ये अपघात की घातपात, हे फॉरेन्सिक तपासणीतून कसे ओळखावे तसेच मृत्यूपूर्व जबाब (Dying Declaration) नोंदविताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या उत्तरार्धात उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दैनंदिन तपासादरम्यान येणाऱ्या फॉरेन्सिक पुराव्यांशी संबंधित अडचणी व तांत्रिक प्रश्नांवर डॉ. खांडेकर यांच्याशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांचे सविस्तर निरसन केले.

फॉरेन्सिक मेडिसिनचा प्रभावी वापर केल्यास तपासाचा दर्जा उंचावण्यास मदत होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या मार्गदर्शनाचा थेट फायदा दैनंदिन गुन्हे तपासात होणार असल्याचेही सांगण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, तपास अधिकारी तसेच पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.