अल्लीपूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

Tue 19-May-2026,11:34 PM IST -07:00
Beach Activities

अल्लीपूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

ना पशुधन विकास अधिकारी, ना परिचारक; गोपलकांची मोठी गैरसोय

अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे

अल्लीपूर : हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना सध्या अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी, परिचारक तसेच इतर महत्त्वाची पदे रिक्त असल्याने शेतकरी व गोपलकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्लीपूर परिसरातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कात्री येथील पशुधन पर्यवेक्षक अधिकारी डॉ. राजपूत आणि तळेगाव टालाटुले येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. मराठे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परिणामी, एका अधिकाऱ्यावर तब्बल तीस गावांचा कार्यभार आल्याने पशुधन सेवा विस्कळीत झाली आहे.

यातच नुकतेच पदोन्नती झालेल्या परिचारक संदीप श्रीरामे यांची शिरूड येथे बदली झाल्याने परिचारकाचे पदही रिक्त झाले आहे. त्यामुळे सध्या दवाखान्यात ना डॉक्टर उपस्थित असतात, ना परिचारक. यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

गोपलकांची मोठी गैरसोय

कात्री आणि तळेगाव येथील दोन अधिकाऱ्यांवर तीस गावांची जबाबदारी असल्याने पशुपालकांना वेळेवर सेवा मिळत नाही. अनेक गावांचे अंतर पाच ते दहा किलोमीटर असल्याने शेतकऱ्यांना आजारी जनावरे घेऊन दवाखान्यात जाणे कठीण ठरत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा संपूर्ण दिवस वाया जात असून जनावरांच्या उपचारांमध्येही अडचणी निर्माण होत आहेत.

अनेक पदे रिक्त

सद्यस्थितीत अल्लीपूर येथील पशुधन विकास अधिकारी, परिचारक, व्रणोपचारक आदी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दवाखान्याच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

अल्लीपूर परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असूनही दवाखान्यात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गोपलकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करावा, जेणेकरून परिसरातील शेतकरी व पशुपालकांना दिलासा मिळेल, अशी मागणी स्थानिक गोपलकांनी केली आहे.