दिव्यांगांना स्वावलंबनाचे पंख देणे हेच खरे मानवी कर्तव्य – मोहन अग्रवाल
दिव्यांगांना स्वावलंबनाचे पंख देणे हेच खरे मानवी कर्तव्य – मोहन अग्रवाल
नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांगांना साहित्याचे वितरण
( नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा )
वर्धा : समाजातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हेच खरे मानवी कर्तव्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी केले. नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई शाखा वर्धा यांच्या वतीने गजानन महाराज देवस्थान मंदिर सभागृहात आयोजित दिव्यांग साहित्य वितरण सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
स्व. बिसन जानू कुमरे, मुंबई व स्व. मारग्या कुमरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, वॉकर, वॉकिंग स्टिक आदी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या साधनांमुळे दिव्यांगांना आत्मविश्वास व स्वातंत्र्य मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यास मदत होते, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ होते. प्रमुख अतिथी म्हणून नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे, ज्येष्ठ समाजसेवक श्यामसुंदर राठी, राजेश बगाडे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र चांदेकर, प्रवीण धोपटे, कॅप्टन मोहन गुजरकर, अ. सत्तार इनामदार, विजय सत्यम, दिलीप मसने, इमरान राही, किरण फुलझेले, कविता भस्मे, हरीष तांदळे, प्रकाशसिंग बावरी, धर्मदेव कुमरे, भिमराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ यांनी समाजाने दिव्यांगांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर आपुलकीच्या नात्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असून त्यांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी शासनाच्या योजनांसोबत समाजातील दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घेऊन दिव्यांगांपर्यंत मदतीचा हात पोहोचवावा, हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना इमरान राही यांनी मांडली. संचालन हरीष तांदळे यांनी केले तर आभार अमोल मानकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेश धोपटे, नरेश कुमरे, दीपक अग्रवाल, साहिल वाघ, विक्रांत गव्हाणे, मिहीर वाघ, पल्लवी कुमरे, नवीन टेकाम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.