महाराष्ट्रातील CCTNS कामगिरीत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल

Fri 15-May-2026,12:32 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

201 पैकी 201 गुण मिळवत हिंगोली पोलीस दलाची शंभर टक्के कामगिरी.

हिंगोली : महाराष्ट्रातील 53 पोलीस घटकांमध्ये हिंगोली जिल्हा पोलीस दलाने सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network & Systems) कार्यप्रणालीमध्ये उल्लेखनीय यश मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. फेब्रुवारी 2026 महिन्याच्या मूल्यमापनात हिंगोली जिल्ह्याला 201 पैकी 201 गुण प्राप्त झाले असून 100 टक्के कामगिरीची नोंद झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे जिल्हा पोलीस दलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

राज्यात सप्टेंबर 2015 पासून सीसीटीएनएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून पोलीस कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. हिंगोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांमधील कामकाज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविले जात आहे. तक्रारींची ऑनलाईन नोंद, गुन्ह्यांचा तपास, आरोपींची माहिती, प्रतिबंधक कारवाया आणि विविध नोंदी वेळोवेळी प्रणालीमध्ये अद्ययावत केल्या जात आहेत.

जिल्ह्यात सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणून कमलेश मीना कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पर्यवेक्षक आणि देखरेख अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून सर्व पोलीस ठाण्यांतील ऑनलाईन कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे.

सीसीटीएनएस शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल राजु हमाने, राहुल तडकसे आणि महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव यांच्याकडून दर महिन्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. सीसीटीएनएससोबतच आयसीजेएस, आयटीएसएसओ आणि क्रायमॅक या पोर्टल्सचे तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात येते. त्यामुळे तांत्रिक अडचणी तात्काळ दूर होऊन कामकाज अधिक परिणामकारक झाले आहे.

गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून दर महिन्याला राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेतला जातो. फेब्रुवारी 2026 च्या अहवालात हिंगोली जिल्ह्याने सर्वोच्च स्थान पटकावत राज्यात आदर्श निर्माण केला आहे.

या यशामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सीसीटीएनएस पर्यवेक्षक आणि देखरेख अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. सातत्यपूर्ण प्रशिक्षण, वेळेवर डेटा अपडेट आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे हिंगोली जिल्ह्याची सीसीटीएनएस प्रणाली राज्यात आदर्श ठरत असल्याचे बोलले जात आहे.